पृष्ठे

पृष्ठे

भारतीय सण उत्सव

भारतीय सण उत्सव

संपूर्ण भारत देशात सण, व्रत, वैकल्ये, उत्सव साजरे करण्याची अनादिकालापासूनची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीची उज्ज्वल परंपरा टिकवून ठेवणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. त्याचप्रमाणे विविध सणांतून पितरांची सेवा, आराध्य दैवत, इष्टदैवत, ग्रामदैवत, कुलदैवत, कुलदेवता यांची विशेष सेवा करुन जीवनात सौख्य निर्माण व्हावे यासाठी कृपाशिर्वाद मिळविले जातात. कृष्ण जन्माष्टमी, श्रीपादश्रीवल्लभ जयंती, रामनवमी, गुरुद्वादशी, गणेशजयंती, हनुमानजयंती, श्रीदत्तजयंती, गुरुप्रतिपदा या उत्सवांच्या दिवशी परमेश्वराच्या त्या त्या अवतार कार्याचे स्मरण ठेवून त्यांची सेवा करुन आत्मिक व धार्मिक उन्नती साधून उत्सव साजरे केले जातात. या अवतार कार्यात मानवी जीवनाला आदर्श म्हणून व संकटकाळी मार्ग दाखविण्यासाठीच परमेश्वराने या लीला घडवून आणल्या. संत, महापुरुष, देशभक्त यांची तत्त्वे, त्यांनी त्यांच्या जीवनात कृतीने आचरणात आणलेली नैतिक मूल्ये, अखिल मानवजातीस राष्ट्रधर्माची शिकवण देवून संस्कार, संस्कृती, देशभक्ती, स्वाभिमान यांचा आदर्श त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर ठेवला. त्यांच्या या कृती आपण आचरणात आणून आपल्या जीवनाचा योग्य मार्गाने विकास करण्यासाठी या थोर संत, महापुरुष, देशभक्त यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजर्‍या केल्या जातात. आपल्या भारतात सणांना फार महत्त्व आहे. विविध सणांद्वारे देव देवतांना प्रसन्न करुन त्यांची उपासना करुन सुखी समृद्ध जिवन व्हावे यासाठी प्रार्थना केली जाते. प्रत्येक सणाचा ऋतू व आरोग्य यांच्याशी विशेष संबंध आहे. म्हणजे त्या त्या सणाला ऋतूनुसार देवतांना नैवोसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गोडधोड (त्या त्या ऋतूत शरीराला पोषक) अन्नपदार्थ तयार केले जातात.
हे विश्वची माझे घर या उक्तीप्रमाणे आपण ज्या निसर्गात राहतो. त्यातील घटकांचाही कृपाशिर्वाद मिळविण्यासाठी विविध सणांद्वारे त्यांची सेवा करुन नैवे दाखवून त्यांचे ऋण फेडले जातात. उदा. नारळी पौर्णिमेला समुद्रपूजन, श्रावण अमावास्येला बैलपूजन, कोजागिरी पौर्णिमेला चंद्रपूजन, वसुबारसला गायवासराची पूजा, गंगादशहराला गंगापूजन इ.
निसर्गातील वनस्पतींचे आयुर्वेदिक दृष्टीने फार महत्त्व आहे. त्यामुळे अनेक वृक्ष हे देवदेवतांचे वास्तव्य व ध्यानधारणा स्थळ असल्याने त्यांचेही विशेष पूजन केले जाते. यामध्ये तुलसीपूजन, पिंपळ, वड, औंदुबर इ. वृक्षांचा समावेश होतो.
धर्माच्या व सत्याच्या रक्षणासाठी अनेक अवतार, संत तसेच थोर पुरुष या भारतभूमीत जन्माला आले. त्यांनी केलेले सत्‌कार्य, त्यांनी सांगितलेले ज्ञानतत्त्व हे सतत आपल्या लक्षात रहावे यासाठी त्यांच्या जयंती व पुण्यतिथी साजर्‍या केल्या जातात.
आपण ज्या संस्कृतीत जन्मलो त्या संस्कृतीच्या रक्षणासाठी पुर्वीपासून सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी यांची प्रथा रुढ आहे. तसेच व्रतांद्वारे आपल्या मनातील सर्व इच्छा, मनोकामना यांची पूर्ती होते. व्रते हे विशेषतः स्त्रियाच करतात.
सणांच्या निमित्ताने कुटूंबात परमेश्वराची उपासना केली जाते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात सणाचा दिवस हा विशेष आनंदाचा असतो. सणांच्या दिवशी घरात गोडधोड पदार्थ केले जातात. आनंदमय वातावरणातून कुटुंबात सौख्य टिकून राहते. यातून ईश्वरसेवा व धर्मजागृतीचे कार्य यांची सांगड घातली जाते. पूर्ण भारतवर्षात विविध सणांचे विविध ठिकाणी वेगवेगळी वैशिष्ट्ये (साजरे करण्याची पद्धत) आढळतात. परंतु श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात हे सर्व सण-व्रत उत्सव कसे साजरे करायचे याचे ज्ञान दिले जाते. ॥ श्री स्वामी समर्थ ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा